कानपुर – पतीचा मृत्यू झाल्यानंतरही पत्नीने आणि घरातील इतर सदस्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने हा मृतदेह तब्बल 17 महिने तसाच पडून होता. या काळात पत्नीने मृतदेहालाच आपला पती म्हणून 17 महिने संसारही केला. पोलिसांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
कानपूर शहरात ही घटना घडली असून ज्या घरात तब्बल 17 महिने हा मृतदेह तसाच पडून होता ते घर आता लाशघर नावाने ओळखले जात आहे. या घटनेतील विधवा पत्नीचे नाव मिताली असे असून तिच्या पतीचे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये निधन झाले होते करोनाचे निदान झाल्यावर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने पतीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी घाईघाईने सर्टिफिकेट जारी करून मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले.
कुटुंबीयांनी मृतदेह घरी आणला पण त्यांना त्याचा मृत्यू झाला आहे यावर विश्वास नव्हता. सहाजिकच मिताली आणि इतर सर्वांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. घरात ठेवण्यात आलेल्या या मृतदेहला मितालीची सासू दररोज या अंघोळ घालत असे आणि पाणीही पाजत असे.
या कालावधीमध्ये आलेले अनेक धार्मिक सण सुद्धा या कुटुंबाने साजरे केले. पती आणि पत्नीच्या प्रेमाचा प्रतीक असलेले करवा चौथ हे व्रत सुद्धा मितालीने केले. पतीचा देह समोर असल्याने त्याचा मृत्यू झाला हे मान्य करणे शक्य नसल्याने मी करवा चौथ व्रत केले असे ती आता सांगते. 17 महिन्यांच्या कालावधीमध्ये या मृतदेहाची अवस्था अतिशय वाईट झाली. हा मृतदेह कोळशासारखा काळाठीक्कर पडला होता.
काही लोकांनी ही गोष्ट प्रशासन आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पुन्हा एकदा या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सर्टिफिकेट इशू करण्यात आले. त्यानंतर कुटुंबाच्या संमतीने अत्यसंस्कार करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मृतदेह या घरातील दुसऱ्या मजल्यावर एका पलंगावर ठेवला होता या कालावधीमध्ये मृतदेह कुजल्याबाबत किंवा अन्य कोणत्याही प्रकारची दुर्गंधी या घरात येत नव्हती किंवा आजूबाजूच्या लोकांनाही कोणत्याही प्रकारची दुर्गंधी जाणवत नव्हती. 17 महिन्यांच्या कालावधीमध्ये मृतदेह संपूर्णपणे एखाद्या ममीसारखा दिसत होता. काळाठिक्कर पडला होता या अनोख्या घटनेची चर्चा उत्तर प्रदेशात सुरू आहे.