लैंगिक गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने ठोठावली, कपडे धुण्याची अजब शिक्षा

भागलपूर – महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या लैंगिक गुन्ह्यातील एका आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे सतत सहा महिने धुण्याची शिक्षा न्यायालयाने फर्मावली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील झंझापुर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

या न्यायालयात आरोपीच्या जामीनावर सुनावणी सुरू असताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुमार यांनी लैंगिक गुन्ह्यातील अशा प्रकारच्या आरोपींनी महिलांचा सन्मान करणे शिकले पाहिजे अशी टिप्पणी करून या आरोपीला अनोखी ही शिक्षा सुनावली.

गावातील सर्व महिलांचे कपडे धुऊन त्याला इस्त्री करण्याचे काम शिक्षा म्हणून या आरोपीला देण्यात आले आहे. या आरोपीला सहा महिने ही शिक्षा भोगायची असून गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत या शिक्षेवर लक्ष ठेवणार आहे. ही शिक्षा संपल्यावर त्याला ग्रामपंचायतीकडून महिलांना मोफत सेवा दिल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते न्यायालयात सादर करावे लागणार आहे.

आरोपी वीस वर्षाचा असून तो व्यवसायाने धोबी आहे. बलात्कार किंवा तत्सम गंभीर लैंगिक गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच दिला असला तरी देशात अनेक ठिकाणी संबंधित ग्रामपंचायती किंवा जात पंचायतीने अशा प्रकारचा आरोपींना विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बहरन गावातील एका आरोपीला महिलांकडून चपलाने चोप देण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गाझियाबाद जिल्ह्यातील एका आरोपीला अल्पवयीन पीडित मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अशा शिक्षा जातपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीने सुनावल्या होत्या; पण एखाद्या न्यायालयाने लैंगिक गुन्ह्यातील आरोपीला अशा प्रकारची अनोखी शिक्षा ठोठावण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.