शिक्रापूर -येथील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर टेम्पो, स्कोर्पिओ आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात 12 वर्षीय मुलचा जागेवर मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 16) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्कॉर्पिओमधील समाधान राजू आयनुर (वय 12 रा. रितनगाव ता. लोहा जि. नांदेड) असे अपघातत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर दुचाकीवरील गणेश विलास वाणी, ज्ञानेश्वर अर्जुन पवार (दोघे रा. शिक्रापूर ता. शिरूर) तर स्कॉर्पिओमधील गंभीर दोघांची नावे समजू शकलेली नाही. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जखमी प्रकाश माऊली बनकर (रा. मोशी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. गणेश विलास वाणी (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूरकडून चाकणकडे निघालेल्या (एमएच 14 सीपी 0617) टेम्पो चालकाने समोरील वाहनास ओव्हरटेक करताना समोरून चाकण बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला (एमएच 19 बीआर 6762) धडक दिली. त्याचवेळेस समोरून चाकणकडून शिक्रापूरच्या दिशेने येत असलेली स्कॉर्पिओला (एमएच 22 एएम 1466) जोरदार धडक दिली.
यावेळी टेम्पो आणि स्कोर्पिओची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने टेम्पोचालक आणि स्कोर्पिओमधील दोघे गंभीर जखमी झाले. तर समाधानचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.