-विनोद मोहिते
इस्लामपूर : नियमित वेळेत कामावर या नाहीतर वेतन रोखू..निलंबन करू अशी नोटीस, अन् दुसरीकडे सेवानिवृत्ती नंतरही मला काम करायची इच्छा आहे.मला मोबदला नको.. सेवा करायची आहे असे सांगणारा सफाई कामगार …असा परस्परविरोधी अनुभव इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी घेतला. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात नगरपालिकेच्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण होते.मात्र सेवानिवृत्तीनंतर सुरेश सुबय्या मद्रासी हे याला अपवाद ठरले आहेत.
आज संपुर्ण जग कोरोनाशी सामना करीत आहे. देश लॉक डाऊन आहे. इस्लामपूर शहरात २३ मार्चला एकाच कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आणि इस्लामपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आणि बघता बघता आठ दिवसांत सुमारे २५ जणांना कोरोनाची बाधा झाली.
सुरुवातीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीती होती. पण स्वतः नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, पदाधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम सुरू केल्याने कामगारांच्या मनोधैर्यात वाढ झाली आहे.
आज २४ तास आपत्कालीन सेवा देण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. या परिस्थितीतही काही कर्मचारी कोरोना विषाणूच्या संसर्गाला घाबरून काही न काही सबबी सांगुन कामावर हजर राहणे टाळत आहेत, पण इस्लामपूरचे सुरेश सुबय्या मद्रासी मात्र सेवानिवृत्त असूनही त्याला अपवाद ठरले आहेत. सफाई कामगार म्हणून ते महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले आहेत शहरात कामगारांची अपुरी संख्या आहे. हे ओळखून सुरेश सुबय्या मद्रासी यांनी थेट मुख्याधिकारी केबिन गाठले. अन् अर्ज सादर केला. दिलेल्या अर्जात ‘विनामूल्य काम करण्याची संधी मिळावी’ असा उल्लेख केला. मुख्याधिकारी पवार यांना त्यांनी पुन्हा कामावर येण्याची संधी मागितली. त्यांना ही सुखद धक्का बसला. आपत्कालीन परिस्थिती असताना संधी मागून सेवेत दाखलही झाले आहेत. त्यांची ही कृती इतरांना प्रेरणादायी आहे.
“कोरोना विषाणू संसर्गाची भीती असताना काम टाळणारे कर्मचारी आणि मद्रासी यांच्यात खूप फरक आहे. काम टाळणारे कर्मचारी स्वतःची आणि शहराचीही फसवणूक करीत आहेत. सुरेश मद्रासी यांच्या स्वतःहुन शहराला पुर्ण वेळ विनामुल्य सफाई सेवा देण्याच्या भावनेचा आदर्श इतरांनी घ्यावा.”
– प्रज्ञा पवार-पोतदार (मुख्याधिकारी)