टोकियो – हैशेन हे चक्रिवादळ जपानच्या ओकिनावा बेटांच्या दिशेने सरकत आहे. एकाच आठवड्यात जपानच्या दिशेने सरकणारे हे दुसरे मोठे चक्रिवादळ आहे. हैशेन चक्रिवादळाबाबत गेल्या काही आठवड्यांपासून हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धोक्याचा इशारा दिला जात होता. नागरिकांनी आपल्या जवळपासच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि आवश्यक अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात येत होते.
हैशेन चक्रिवादळामुळे शनिवारी वाऱ्याचा वेग ताशी 198 किलोमीटर इतका असून हे वादळ ओकिनावा शहराला रविवारी थडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिणेकडील क्युशूकडे सरकण्याची शक्यता आहे. वादळामुळे या परिसरात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असून समुद्रही खवळलेला असणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हैशेन हा चिनी शब्द असून त्याचा अर्थ सागरी देवता असा होतो. हे वादळ समुद्रामध्ये ईशान्येकडे, जपानच्य दक्षिणेकडील मिनामी दाइतो या बेटाच्या दक्षिणेकडे ताशी 15 किलोमीटर वेगाने सरकत आहे. हे वादळ मंगळवारी कोरियन द्विपकल्पाला धडकण्याची शक्यता आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला मायसाक चक्रिवादळाने दक्षिण जपानला धडक दिली होती. त्यात शेकडो घरांचे नुकसान झाले होते आणि डझनभर लोक जखमी झाले होते. न्युझिलंडवरून 5,800 गायींचे पशुधन असलेले जहाज या वादळामुळे जपानच्या किनाऱ्याजवळ बुडाले होते. जहाजावरील 43 खलाशांपैकी केवळ दोघांना वाचवण्यात यश आले होते