अनेक ठिकाणी बत्ती गूल, दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार
पुणे – शहर आणि जिल्ह्यात “निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला. यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने सुमारे 540 वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. तर, शहराच्या विविध भागांत तसेच पिंपरी-चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे आणखी दोन दिवस तरी वीजेचे खेळखंडोबा राहणार आहे.
पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे. तर, पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे.