लंडन : दर्राघ वादळाच्या प्रभावामुळे ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे हजारो जणांना घरातच अडकून पडावे लागले आहे. दर्राघ वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ९३ मैल इतका नोंदवला गेला आहे. हवामान विभागाने जवळपास ३ दशलक्ष नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिसरातील नागरिकांना सायरनद्वारे आणि मोबाईलवर धोक्याचे संदेश पाठवून हा धोक्याचा इशारा देण्यात आला.
शुक्रवारी ब्रिटनच्या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या कार्यालयाने सर्वात गंभीर असा रेड अलर्ट जारी केला. उत्तर आयर्लंड, वेल्स आणि पश्चिम इंग्लंडमधील हजारो घरांचा वीजपुरवठा रात्रभर खंडीत राहिला. जोरदार वाऱ्यामुळे देशभरातील प्रमुख महामार्ग आणि पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते आणि अनेक रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली होती. संपूर्ण आठवड्याच्या शेवटी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे, असे नॅशनल रेल्वेने सांगितले.
आयर्लंडमध्ये, वादळाचा परिणाम म्हणून जवळजवळ ४ लाख घरे, शेतातील किंवा व्यवसायांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. डब्लिन विमानतळावरील काही उड्डाणे रद्द करण्यात आली होती. सुरक्षेसाठी कार्डिफ विमानतळाची धावपट्टी आजसाठी बंद करण्यात आली आहे. लिव्हरपूल आणि मँचेस्टरसह इतर विमानतळांवरील उड्डाणे, दिवसभर रद्द किंवा विलंबाचा सामना करावा लागला.