प्रतिबंधित क्षेत्रात वाहनांची तुफान गर्दी
पोलिसांना न जुमानता नागरिकांची भ्रमंती
पुणे – शहरातील बहुतांश प्रतिबंधित क्षेत्रात सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली होती. विशेषत: उपनगरांमध्ये अधिक गर्दी होती. त्यामुळे शंभर टक्के लॉकडाऊनचा नागरिकांना विसर पडला, की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता.
करोना प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात औषधांची वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. तरी देखील अनेक भागांमध्ये नागरिक वाहने घेऊन ये-जा करत होते. उपनगरांही याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस वारंवार उद्घोषणा करत आहेत. या ठिकाणी तैनात असणारे पोलीस नागरिकांना चौकशी केल्यानंतर जाण्याची परवानगी देत होते. अनेक जण विविध कारणे सांगत प्रवास करू द्यावा, अशी मागणी करत होते.
सेव्हन लव्हज चौकात घडलेला प्रकार
सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सेव्हन लव्हज चौकाकडून भवानी पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांकडून या परिसरातील रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आला होता. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी राखीव ठेवलेल्या जागेतून अनेक वाहनचालक ये-जा करण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळ या ठिकाणी वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित रस्ता पूर्णपणे बंद केला. याशिवाय सातारा रस्त्यावर रस्त्यावर देखील भर दुपारी देखील वाहनांची अधिक वर्दळ होती.
सूक्ष्म प्रतिबंधित आणि प्रतिबंधित क्षेत्रात वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. या क्षेत्रांतील रस्तेदेखील बंद केले आहेत. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
– डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.