प्रवासी आणि अवजड वाहनचालकांना दिलासा
पुणे – प्रवासी आणि अवजड वाहनांना रिफ्लेक्टर्स, रिफ्लेक्टीव्ह टेप आणि “रियर मार्किंग प्लेट बसविणे आवश्यक असण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
“केंद्रीय मोटार वाहन नियम 1989′ च्या नियमातील तरतुदीनुसार “एआयएस 089′ आणि “एआयएस090′ मानकांची पूर्तता करणारे मान्यताप्राप्त “रिफ्लेक्टर्स’, “रिफ्लेक्टीव्ह टेप्स’ आणि मागील बाजूस “रियर मार्किंग प्लेट किंवा टेप’ लावणे बंधनकारक करण्यात आले होते. या सर्वांची पाहणी केल्यानंतरच वाहनांना नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्याचे सांगण्यात आले होते. राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी 28 जून रोजी याबाबतचे परिपत्रक काढून 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले होते.
त्यामुळे गेले तीन दिवस वाहनचालकांना नोंदणी करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यामध्ये नव्या वाहनांची नोंदणी आणि योग्य प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प होते. त्याचबरोबर वाहतूक संघटनांकडून या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे संघटनांची मागणी आणि रिफ्लेक्टर्स सारख्या बाबींचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची मर्यादित संख्या पाहता या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना अटींची पूर्तता करण्यासाठी अवधी मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रिफ्लेक्टर संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे प्रवासी वाहनांचे काम सुरू राहणार आहे.
– विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी