मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे विविध मंत्र्यांसाठी नवीन वाहन खरेदी करण्याकरिता उधळपट्टी करू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्याकरिता शासनाकडे पैसे नाहीत. याच करणातून पगार कपातीचे संकेत मंत्र्यांकडून दिले जात आहेत तसेच करोना संकटावर मात करण्याकरिता आणखी कोट्यवधी रुपयांचे गरज भासणार आहे. अशा स्थितीत मंत्र्यांसाठी नव्या वाहनांचा घाट घालणे कितपत योग्य आहे.
राज्याची तसेच नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. शासनाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वेतन व शाळांचे अनुदान प्रलंबित ठेवून शालेय शिक्षण मंत्री व इतर मंत्र्यांसाठी लाखो रुपये किंमतीची वाहने खरेदी करण्याची आवश्यकता नाही. इनोव्हा क्रिस्टा या वाहन खरेदीसाठी खर्च करण्याऐवजी शाळांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, असे विटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.