पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी हा शहरातील दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या योजनांना खर्च करणे आवश्यक आहे. परंतु, महापालिका निधीचा गैरवापर करत असल्याची तक्रार आली आहे. दिव्यांग निधीची उधळपट्टी त्वरित थांबवावी. याबाबत उचित कार्यवाही करावी. कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी हा शहरातील दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या योजनांना खर्च करणे आवश्यक आहे. परंतु, महापालिका निधीचा गैरवापर करत आहे. अंपंग संघटनांचा विरोध असतानाही सल्लागारासाठी 39 लाख 60 हजार रुपये मंजूर केले आहेत.
गेल्या वर्षी या सल्लागारावर 21 लाख 77 हजार रुपये अपंग निधीतून खर्च केले होते. या सल्लागाराच्या सल्ल्याने एकही दिव्यांग व्यक्तीला फायदा झाला नाही. त्यामुळे सल्लागार नियुक्त करू नये, अशी मागणी अपंग बांधाव करीत होते. त्यानंतरही पुन्हा 39 लाखांचा विषय मंजूर करण्यात आला.त्यावर या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.