महामेट्रोचे काम बंद ठेवा!

शहर अभियंत्यांचे महामेट्रोला पत्र : लोकप्रतिनिधीच्या अट्टाहासानंतर पालिकेचा निर्णय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांना महामेट्रोच्या ठेकेदाराने ठेवलेल्या बाऊंसरकडून जिवे मारण्याची धमकी देण्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीदेखील महापालिका मुख्यालयात उमटले. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मडिगेरी यांची भेट घेत, झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्‍त केला. मात्र, महामेट्रोकडून आपत्कालीन कृती आराखडा आणि रस्ता सुरक्षा अहवाल पालिकेला सुपूर्द करेपर्यंत महामार्गावर सुरू असलेले महामेट्रोचे काम बंद ठेवावे, असे लेखी पत्र सहशहर अभियंता राजन पाटील यांनी महामेट्रो प्रशासनाला दिले आहे.

मोरवाडी चौकात मंगळवारी (दि.9) रात्री स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्याशी महामेट्रोच्या ठेकेदाराच्या बाऊंसरनी गैरवर्तन केले होते. त्यानंतर मडिगेरी यांनी तत्काळ महापालिका आयुक्‍तांना लेखी पत्र देत, महामेट्रोच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्‍त करत, याप्रश्‍नी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. व पालिकेने तात्काळ निर्णय घेऊन महामेट्रोचे काम बंद ठेवावे असा अट्टाहास धरला. त्यानंतर सहशहर अभियंता राजन पाटील यांनी महामेट्रोच्या कार्यकारी संचालकांशी लेखी पत्रव्यवहार केला आहे.

यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. महामेट्रोच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवायची असल्यास, त्याकरिता महापालिका व पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतली जात नाही. रस्ता बंद ठेवताना पर्यायी वाहतुकीचे नियोजनाची प्रसार माध्यमांमधून प्रसिद्धी केली जात नाही, यासह विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून, महामेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करताना वाहतूक विभाग, महापालिका परवाने, परवान्यातील सुचनांचे तंतोतंत पालन होईपर्यंत तसेच महामेट्रोकडून आपत्कालीन कृती आराखडा आणि रस्ता सुरक्षा अहवाल सुपूर्द करेपर्यंत महामार्गावर सुरू असलेले महामेट्रोचे काम बंद ठेवावे, असे या पत्रामध्ये नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.