कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांचे काम थांबवा

विरोधी पक्षनेत्यांची आयुक्‍तांकडे मागणी

पिंपरी – कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात होताच अवघ्या दोन दिवसात काम थांबविण्याची नामुष्की बी.व्ही.जी. व ए.जी. एन्वायरो या दोन ठेकेदरांवार आली आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी जे ठेकेदार अक्षम ठरले आहेत. त्यांच्या “वर्कऑर्डर’ त्वरीत थांबवाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते कार्यालयात शुक्रवारी (दि.5) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बीव्हीजी व ए.जी.एनव्हायरो यांच्याकडे शहरातील प्रत्येक घरातून कचरा गोळा करणे व तो मोशी कचरा डेपो येथे कचरा टाकणे असे कंत्राट आहे. यावेळी साने म्हणाले की, असताना प्रभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्या काय करत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नव्याने काढलेल्या निविदेसाठी आणखी चार कंत्राटदारांनी निविदा पाठवल्या होत्या. मात्र त्यांचे पाकिटे अद्याप उघडली गेली नाहीत, ती उघडावीत.

कारण नवीन निविदा दरपत्रके ही बीव्हीजी व ए.जी. एनव्हायरो यांच्यापेक्षा 400 रुपयांनी कमी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून दिवसाला एक हजार टनाच्या जवळपास कचरा वाहून नेला जातो. यावरून हा खर्च दिवसाला 4 लाख रुपयांनी तर वर्षाला 14 कोटी 60 लाख रुपयांनी वाढतो. हे कंत्राट आठ वर्षांसाठी संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका 116 कोटी 80 लाख रुपयांचा अतिरिक्‍त आर्थिक भार उचलत आहे. तसेच संबंधित कंपनीला महापालिकेने 1 एप्रिल पासून कामाचे आदेश दिले होते. मात्र दोनच दिवसात हे काम त्यांनी पुन्हा बंद केले. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत.

त्यामुळे जुन्याच कंत्राटदारांकडून काम करुन घेण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. त्यामुळे महापालिकेने उच्च न्यायालयाचा आदेशाद्वारे हे काम मिळवले आहे. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत संबंधित कंपनीकडून हे काम काढून घ्यावे व काम करत नसल्यामुळे दोन्ही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे. ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणी दत्ता साने यांनी केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.