वाहनचालकांची मागणी : केसनंद फाटा येथे ट्रॅव्हल्सवर कारवाई
वाघोली -पुणे – नगर महामार्गावर वाघोली येथील केसनंद फाटा येथे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर लोणीकंद पोलिसांकडून धडक कारवाई केली. मात्र, कारवाई केल्यानंतर राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. या कारवाईवेळी पोलिसांवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नगर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बुकिंग केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा हे खासगी व्यावसायिक उठवित आहेत.
बऱ्याचवेळा ट्रॅव्हल्सचालक रस्त्याच्या मध्येच गाडी उभी करून प्रवासी घेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक व नागरिकांना करावा लागत आहे. खराडी बायपास, वाघोली येथील केसनंद फाटा येथे सायंकाळी ट्रॅव्हल्सचालक बेशिस्त गाड्या उभ्या करीत आहेत. त्यामुळे लोणीकंद पोलिसांकडून बेधडक कारवाई करून या चालकांकडून दंड आकारला आहे.
त्यात काही महाभाग चालक राजकीय नेत्यांकडून दबावतंत्राचा वापर करीत होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देणारी पोलीस यंत्रणा राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हतबल झाली असल्याचे चित्र दिसत आहे. हा प्रकार सुरू झाल्यास पोलीस यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येणार नाही, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.