आरोपीला पाठीशी घालणाऱ्या वाणी यांना सहआरोपी करण्याची मागणी
राहुरी – राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील वाणी सेंट्रल स्कूल येथे झालेल्या अत्याचार घटनेतील आरोपी महेश चाचर याला कठोर शासन करून त्याला पाठीशी घालणाऱ्या बाळासाहेब वाणी या संस्था चालकाला जोपर्यंत सहआरोपी करून कारवाई होत नाही. तोपर्यंत आरपीआय आठवले गटाचे आंदोलन सुरू राहील, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी राहुरी येथे रास्ता – रोको आंदोलन दरम्यान केले.
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील वाणी सेंट्रल स्कूल, येथे निवासी वसतीगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या महेश प्रभाकर चाचर या नराधमाला कठोर शासन व्हावे. तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या शाळा प्रशासन तसेच पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, संबंधित पिडीत मुलीला तातडीने न्याय मिळवा. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने थोरात व साळवे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रविण लोखंडे, महिला जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. जालिंदर घिगे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेगांव वाणी सेंट्रल स्कुलमध्ये राहुन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर महेश चाचर नावाच्या शाळा कर्मचाऱ्याने वेळोवेळी अत्याचार केला. त्याबाबत मुलीचे चुलते, आई वडिलांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार दाखल करूनही दखल घेतली नाही.
पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा थोरात यांनी दिला. दिलेल्या निवेदनावर युवा तालुकाध्यक्ष प्रदीप भोसले, कुंदन आरवडे, नगरसेवक वैभव गिरमे, तुषार दिवे, रॉबर्ट सॅमुवेल, बबन साळवे, प्रदिप भोसले, संजय संसारे, दिपक त्रिभूवन, सचिन डहाणे, पिंटू अल्हाट, राजेंद्र दाभाडे, अंकुश बर्डे, सागर आदिंच्या सह्या आहेत.