पिंपरी – करोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयाकडून मनमानी कारभार केला जात आहे. बेड रिकामे असतानाही उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. खासगी रुग्णालयांची मनमानी थांबविण्यासाठी महापालिकेने जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच, नागरिकांना बेड उपलब्ध व्हावेत म्हणून प्रत्येक रुग्णालयासाठी अधिकारी नेमावा. त्या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
करोना उपचारसंदर्भातील आयोजित आढावा बैठकीत महापौरांनी हे आदेश दिले. बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महापालिका रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते.
पक्षनेते ढाके म्हणाले की, खासगी रुग्णालयात महापालिकेच्या हेल्प डेस्कद्वारे किती बेड वापरण्यात आले, किती शिल्लक आहेत, यांचा नियमित आढावा पालिकेच्या वॉररूमला देण्यात यावा, त्यामुळे नागरिकांची सोय होईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेता भरती करण्यात आली आहे. दहा रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण शोधमोहीम, पाठपुरावा तसेच, रुग्णांना समुपदेशन व वैद्यकीय मार्गदर्शन याकरिता 30 मल्टीपर्पज वर्करची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.