रॅगिंगला अजिबात घाबरु नका : प्रतिकार करा

रॅगिंगच्या संबंधित अनेक कृतींबद्दल शिक्षा देण्याच्या तरतुदी

– वरुण ग्रामोपाध्ये
महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताच सिनियर स्टुडन्ट्‌सकडून ज्युनियर्सना छळले जाते, ज्याला रॅगिंग म्हणतात. सर्वच कॉलेजात रॅगिंगविरोधात पथके तैनात असली तरी वेगवेगेळ्या मार्गाने हा छळ होतच रहातो आणि नव्याने प्रवेश घेतलेला विद्यार्थी या छळाची शिकार बनतो. काय आहेत याविषयीच्या कायदेशीर तरतुदी? वाचा तर मग…

“मी एका नवीन ठिकाणी आहे, मी खरोखर कोणालाही ओळखत नाही, कोणालाही मी आवडत नाही आणि मला का हे माहित नाही. हे उत्तर असायला हवे होते हर्षचे, पण रागवतील या भीतीने त्याने, “काही नाही पप्पा, दमलोय’ एवढेच सांगितले. तो नुकताच आपल्या कुटुंबासह सांगलीहुन पुण्याला शिफ्ट झाला होता. त्याला पहिल्या दिवशी त्याच्या बोलण्यावरुन हुर्यो करुन एकटे पाडले, त्यानंतर त्यांनी त्याच्या दिसण्यावरुन खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यानी धाडस करुन एकदा मम्मीला सांगायचा प्रयत्न केला,पण ती म्हणाली, “अरे एवढा धडधाकट मुलगा ना रे तु? रडतोस कसला? काही नाही, शाळेत न जाण्याची कारणं आहेत नुसती.’

पुढच्या दिवशीही तसेच. आधी “पोरा पोरा’ करुन सगळ्यांनी उचकवले, आणि याला राग अनावर झाल्यावर भांडताना पाहुन शिक्षकांनी प्राचार्यांकडे पाठवले. प्राचार्यांच्या हातून शिक्षा मिळेल हे समजताच हर्षला सुचायचे बंद झाले. गप्प राहुन त्याने प्राचार्यांची सर्व बोलणी खाल्ली, आणि परत त्याच मुलांच्यात येऊन बसला. त्याला समोर काहीच पर्याय दिसत नव्हता. घरी गेल्यावर गृहपाठ होताच, आणी तो केल्याशिवाय बोलायचेदेखील नाही असे त्याला बजावले होते. खरे तर त्या संध्याकाळी तो खेळायला बाहेर जाऊ शकला असता. पण त्याची बाहेर जाण्याची इच्छाच संपली होती. या परिस्थितित दोन महिने गेले. या काळात त्याने भरपुर वेळा छ्ळणाऱ्याला फटका दिल्याबद्दल, टर उडवणाऱ्यांवर ओरडल्याबद्दल, शिक्षक ओरडत असताना त्यांना थांबवुन घडला प्रकार समजावताना शांत न बसता उलटे बोलल्याबद्दल अशा अनेक कारणांसाठी शिक्षा भोगुन झाली होती.

पहिली चाचणी आली, आणी पहिल्या पेपरपासुनच हर्षच्या महत्वाच्या वस्तु गहाळ होऊ लागल्या. भूमितीच्या पेपरला कंपास गायब व्हायचा, तर इंग्रजीच्या पेपरला शाई पेन. कसेबसे त्याने पेपर लिहीले आणी परिक्षा संपल्याबद्दल देवाचे आभार मानले. चाचणीचा रिझल्ट लागला, आणि हर्षचे गुण ढासळलेले दिसले. वर्गशिक्षकांपासुन प्रत्येक विषयाच्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी त्याचा पाणउतारा केला. “असे कसे कमी गुण मिळवलेस? सगळ तर शिकवलं होत तुला,’ असे त्याला ऐकावे लागले.

पप्पांनेही वेळ न घालवता त्याला ट्युशन लावुन दिली. त्या चाचणीत हर्षचे गुण जे ढासळले, ते कधी वाढलेच नाही. आज हर्ष 28 वर्षांचा आहे, आणि तो आजही कोणाशी मनमोकळेपणानी बोलत नाही. कोणी मोठ्या आवाजात बोलले तर नकळत मान खाली घालतो. वैयक्तिक सीमांच भान नसल्याने कसाही वागवला जातो,आणी जमेल तेवढा एकटाच राहतो.

या कथेतिल हर्ष हे पात्र जरी काल्पनिक असले, तरी वास्तवातिल कित्येक जणांचे अनुभव हे त्याच्याशी मिळतेजुळते आहेत. या छ्ळवादात्मक वागणुकिच्या प्रकाराला बुलियिंग व शारीरीक अथवा मानसिक इजा झाल्या तर रॅगिंग असे म्हणतात. गेल्या काही वर्षात यासंबंधी जागरूकता आली आहे व त्यासंबंधीत लेक्‍चर,वर्कशॉप अनेक झालेले आहेत. परंतु प्रशिक्षकांचा कल हा विद्यार्थ्यांना आपण कसे कोलमडून जाउ नये व आपल्याला छ्ळायचा प्रयत्न होत असताना कसे आपले रोजचे जीवन नॉर्मल असल्यासारखे जगावे, याकडेच झुकताना दिसून येत आहे.

आपण कधी कोणाला छळू नये असा संदेश देणारे, व छळल्यास आपणाला कोणत्या गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल याबद्दल कोणतेच भाषण दाखवले जात नाही का?

इंडियन पिनल कोडमध्ये बुलियिंग व रॅगिंगच्या संबंधित अनेक कृतींबद्दल शिक्षा देण्याच्या तरतुदी आहेत. अश्‍लील कृत्ये, बोलणे, गाणी ईत्यादीचा समावेश असल्यास कलम 294 अंतर्गत तक्रार नोंदवता येते. जर बळजबरीने दुखापत केली असेल तर कलम 324 अंतर्गत तक्रार नोंदवता येते. शस्त्र बाळगुन दुखापत केली असल्यास कलम 324 व कलम 325 अंतर्गत तक्रार नोंदवता येते. बांधुन अथवा डांबुन ठेवले असल्यास कलम 339 व कलम 340 यांच्या अंतर्गत तक्रार नोंदवता येते. आयपीसीच्या शिक्षा जरी 18 वर्षाखालील व्यक्तींवर अर्थात मायनर विरुद्ध लागु केल्या जात नसल्या, तरी आपण मायनरविरुद्ध तक्रार करु शकता, व त्यासंबंधी पोलिसांकडुन चौकशीदेखील होत असते आणि दोषी मायनर्सना रिमांड होममध्ये अर्थात बालसुधार गृहात पाठवले जाते.

– वरुण ग्रामोपाध्ये

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.