मावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे पोलिसांना निवेदन
लोणावळा – मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पोलीस भरती करू नये, अशी मागणी सकल मराठा समाज मावळच्या वतीने बुधवारी (दि. 23) करण्यात आली. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ही मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
यामध्ये मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. ती स्थगिती उठविण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पोलीस भरती थांबवावी, मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी मराठा समाज बांधवांवर जे गुन्हे दाखल दाखल करण्यात आले होते, ते तात्काळ मागे घेण्यात यावे.
करोना संक्रमणाची स्थिती विचारात घेता सकल मराठा समाजाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. किरण गायकवाड, नरेंद्र पाळेकर, अरुण लाड, उमेश तारे, भारत चिकणे, भरत भरणे, बाबाजी कुटे, संतोष येवले, नारायण पाळेकर, रुपेश नांदवटे, संभाजी तिकोणे, दत्ता गोसावी आदींनी ही निवेदने दिली.