पुणे – असंख्य मराठी पुस्तकांच्या पीडीएफ विविध मोबाइल ऍपमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा प्रकार बेकायदेशीर आहे. कॉपीराइट कायद्यानुसार पूर्वपरवानगीशिवाय पीडीएफ स्वरूपात प्रसार करणे गुन्हा आहे. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने पोलिसांत धाव घेतली आहे.
याबाबत आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना निवेदन देण्यात आले. पुस्तकांचे पीडीएफ स्वरूपात बेकायदेशीररित्या सोशल मीडिया ऍपद्वारे फॉरवर्ड केले जात आहेत. यामुळे मराठी प्रकाशक, मुद्रक, वितरक, लेखक यांपासून अगदी ग्रंथालयांपर्यंतच्या घटकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. करोना आणि लॉकडाऊममुळे आधीच खूप मोठा फटका या घटकांना बसलेला आहे.
या पुस्तक “पायरसी‘ला आळा घालण्यात यावा, यासाठी प्रकाशक संघातर्फे दत्तात्रय पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली विशाल सोनी, नितीन गोगटे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि मधुर बर्वे यांनी हे निवेदन दिले.
निवेदनातील मागण्या तसेच पुस्तके पायरसी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा छडा लावू आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करू, असे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.