बारामती, इंदापुरात शेतकरी संघटनेची मागणी : बारामती कमिटीत सचिवांशी चर्चा
निमसाखर (वार्ताहर) – मका खरेदी अनेक ठिकाणी आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत होत आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीत व्यापाऱ्यांना मका विकला जात आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात मका खरेदीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते व राष्ट्रीय किसान मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन देशमाने यांनी दिला आहे. या खरेदीतील लूट थांबवली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी रायते व देशमाने म्हणाले की, करोनामुळे इंदापूर तालुक्यासह अन्य भागातील जनता हैराण आहे. त्यात मध्यंतरीच्या काळामध्ये ओला दुष्काळसदृश्य स्थिती, पूरस्थितीमुळे तालुका होरपळून गेला होता. इंदापूर तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये मका पीक बऱ्यापैकी घेतले आहे. सध्या अडचणीतील शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी आडते व व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी केली जात आहे.
आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने मका खरेदी करणे हे पणन कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. तरीही शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करावी, जमाखर्च ताळेबंद ताब्यात घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मागील काळात कमी किमतीत घेतलेल्या मका खरेदी फरकाची रक्कम देखील वसूल करून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महाराष्ट्रभर दौरा केला आहे. बारामती, इंदापूरसह अन्य तालुके राहिले होते.
बारामती मार्केट कमिटीच्या सचिवांना भेटून आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी चालली आहे ते पुराव्यासह दाखवून दिले आहे. मका खरेदीची आधारभूत किंमत 1850 असून व्यापाऱ्यांनी त्याच्यावर भाष्य करणे गरजेचे आहे. मात्र, त्याप्रमाणे खरेदी होत आहे. प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. 1100 ते 1300 रुपयांपर्यंत बाजारामध्ये मका खरेदीची किंमत होत असल्याचे शेतकरी संघटनेचे व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत व्यापाऱ्यांची पट्टी घेऊन शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करून खरेदीतील लूट थांविण्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा रायते, देशमाने, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहे भोंग यांनी दिला आहे.