आंतरराष्ट्रीय विमानसेवा तातडीने थांबवा; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

मुंबई – ब्रिटनमध्ये नव्या करोना विषाणुंची मोठ्या प्रमाणात लागण सुरू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर युरोपातील देशांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांवर बंदी घालण्याचे काम सुरू केले आहे. नेदरलॅंडने प्रथम अशी बंदी घातली आहे. या पाठोपाठ जर्मनीनेही ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांना बंदी घालण्याचा निर्णय घ्यायचे ठरवले आहे. बेल्जीयमनेही ब्रिटनहून येणारी विमाने आणि रेल्वे आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ  नेत्याने भारतातही ब्रिटनच्या विमानांना बंदी घालण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक पोस्टद्वारे केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये करोनाची नवी लाट पसरली आहे. यामुळे सरकारने तेथून येणारी संपूर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोब स्थगित केली पाहीजे.

Posted by Prithviraj Chavan on Sunday, December 20, 2020

दरम्यान, ब्रिटनमध्ये या विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा नव्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आज एक तृतीयांश ब्रिटन लॉकडाऊनखाली आणण्यात आहे असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितले की नवीन विषाणुंचा प्रसार अत्यंतच घातक ठरत असल्याने अनेक ब्रिटीश नागरीकांना आपला ख्रिसमसचा प्लॅन रद्द करावा लागेल. सध्याची स्थिती फारच भयानक आहे. लस येईपर्यंत ही स्थिती हाताळणे आमच्यासाठी एक मोठेच आव्हान होऊन बसले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटन मध्ये सध्या प्रादुर्भाव करीत असलेला नवीन विषाणु करोनाच्या विषाणुंपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने सर्वत्र पसरतो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.