चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासींच्या सोयीसाठी येत्या 23 डिसेंबर ते 06 जानेवारी दरम्यान पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल हमसफर वातानुकूलित (एस.सी.) चिंचवड रेल्वे स्थानकावर येता-जाता थांबणार आहे. तसेच पुणे येथून सोमवार दि.23 व 30 डिसेंबर रोजी दोनच दिवस फक्त जाण्यासाठीच धावणारी पुणे-करमाली एक्सप्रेस गाडी देखील चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबणार आहे, असे मध्य रेल्वेच्या परिचलन विभागाच्या वतीने चिंचवड रेल्वेस्थानकाचे प्रमुख अनिल नायर यांनी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांना कळविले आहे.
शहरात नोकरी व्यवसायानिमित्त मल्ल्याळी, ख्रिश्चन, मलबारी, दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. चिंचवड प्रवासी संघ, पुणे मल्ल्याळी फेडरेशनच्या वतीने गेली अनेक वर्षे कोकणवासी, गोवा, त्रिचूर, मेंगलोर, कन्नूर आदी भागातील येथील रहिवाशांसाठी एर्नाकुलम एक्सप्रेस गाडीला चिंचवड रेल्वे स्थानकावर प्रथम हंगामी थांबा व नंतर प्रवाशांची चढ-उताराची माहिती संकलित करून कायमस्वरूपी थांबा देण्यासाठी 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे. मागील सुट्टीच्या हंगामात 15 एप्रिल ते 5 जूनपर्यंत चिंचवड येथे थांबा दिला होता. आता नाताळ सणानिमित्त का होईना दिल्यामुळे चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने रेल्वे खात्याचे अभिनंदन केले आहे.
पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल वातानुकूलित (एससी) (ट्रेन क्रमांक 01467) दर सोमवारी चिंचवड येथे रात्री 8 वा.09 मिनिटांनी येणार आहे. या गाडीला चिंचवड स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा असणार आहे. तसेच एर्नाकुलम-पुणे (ट्रेन क्रमांक 01468) दर बुधवारी एर्नाकुलम येथून पहाटे साडे पाच वाजता सुटणार आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी चिंचवड येथे थांबणार आहे.
पुणे-करमाली एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 01497) ही गाडी येणाऱ्या दोन्ही सोमवारी दि.23 व 30 डिसेंबर रोजी पुणे येथून रात्री सुटणार असून चिंचवड रेल्वे स्थानकावर रात्री 9 वाजून 09 मिनिटाला येणार आहे, तिचाही दोन मिनिटांचा थांबा आहे.
पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल हमसफर वातानुकूलित गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिर्विम, करमाली, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, मुकांबिक रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडपी, मुल्की, सुरत्काळ, टोकूर, मेंगलोर जंक्शन, कासारगुढ, कन्नूर, कोझी कोडे, शैरनोर जंक्शन, त्रिचूर, अलुवा व एर्नाकुलम हे थांबे असणार आहे. एकूण 1421 किमीचा प्रवास असणार आहे.
पुणे-करमाली एक्सप्रेस गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, मढगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी असे थांबे असणार आहेत. एकूण 667 कि.मी. अंतरासाठी 16 तास 20 मिनिटांचा प्रवास असणार आहे.
नाताळ सणासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना चिंचवड प्रवासी संघातर्फे शुभेच्छा देण्यात येणार आहेत. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी ऍड. मनोहर सावंत, सूरज आसदकर, मुकेश चुडासमा, निर्मला माने, संगीता जाधव, हार्दिक जानी, मनोहर जेठवाणी, केशना जेठवाणी, संभाजी बारणे, ज्योती डोळस, शरद चव्हाण, नारायण भोसले यानिमित्ताने आदी उपस्थित राहून गाडीचे स्वागत करणार आहेत.