कोल्हापूर – कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्याच्या एसटी बसवर आज दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एसटी बसच्या काचा फुटल्या आहेत. हा सगळा प्रकार सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या सर्व बस सेवा तात्काळ बंद करण्यात आल्या असल्याची माहिती मध्यवर्ती बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी दिली आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्या अन्य व्यक्तीला प्रवशांनी पकडले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शाहुपुरी पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून प्राथमिक माहितीनुसार दगडफेक करणारी व्यक्तीही कर्नाटक राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान काल कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनावरही हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात काल शिवसेनेने कर्नाटकची बस रोखली होती या सगळ्या वादाचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे.
कन्नडीगांनी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख यांच्या वाहनावर केलेला भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या फलकाची तोडफोड, तसेच मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेच्यावतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या गांधीनगर येथील कन्नड फलकांना काळे फासून जशास तसे उत्तर देण्यात आले. शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनी तात्काळ आपले कानडी फलक उतरून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. यावेळी कन्नडीगांचा धिक्कार असो, कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.
तसेच पोलिसांनीही तात्काळ असे कन्नड फलक उतरवण्याच्या नोटीसा संबंधित व्यवसायिकांना बजावाव्यात. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस व व्यापारी जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला.
चौकट
कर्नाटकच्या वाहनांवर जय महाराष्ट्रचे फलक
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या वाहनांवर कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी”जय महाराष्ट्र’चे फलक लावले. कोल्हापूर – कागलजवळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या वाहनांवरही “जय महाराष्ट्र’चे फलक लावण्यात आले. जोपर्यंत बेळगाव महापालिकेवरचा कन्नड संघटनेचा ध्वज काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.