पुणे – महाराष्ट्रातील ट्रकवर कर्नाटकात दगडफेक करण्यात आली आहे. या दगफेकीचे पडसाद पुण्यात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट भागात खासगी पार्किंगमधे उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत बसेसना काळा आणि भगवा रंग लावण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळला आहे. महाराष्ट्रातील काही गावांनी पाणी, रस्त्यांच्या सुविधांअभावी कर्नाटकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील तो भाग कर्नाटकात समाविष्ट करून घेणार असल्याचे सागंतिले. तर महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. ज्या भागात असुविधा आहे त्या भागात सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आज (दि. 6) राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे कर्नाटकला जाणार होते. मात्र वादाची तीव्रता पाहता त्यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. एवढ्या दिवस फक्त बोलाबोलाचे राजकारण सुरु होते मात्र आज कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर हा वाद आता आणखी चिघळला आहे.