जळगाव – महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या मेहरून येथे उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाली. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापौरांच्याच घरावर झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण तापले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे स्थिती सध्या नियंत्रणात आहे.
जय श्रीराम मित्र मंडळाच्या गणपतीची विसर्जनासाठीची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत एक गाव एक गणपती मंडळाशी संबंधित काही सदस्य आले. ही मंडळी नाचत वाजतगाजत पुढे जात होती. महापौर निवासस्थानासमोर मिरवणूक येताच परिस्थिती बदलली. जय श्रीराम मित्र मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एक गाव एक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच काही पेटते सुतळी बॉम्ब घराच्या दिशेने फेकले.
आपल्या मिरवणुकीत घुसखोरी करून महापौरांच्या घरावर हल्ला सुरू असल्याचे पाहून जय श्रीराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामुळे जय श्रीराम मित्र मंडळ आणि एक गाव एक गणपती मंडळ या दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते थोडा वेळ एकमेकांसमोर आले. तणाव वाढला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दगडफेक करणाऱ्या काही जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दगडफेकीचे कारण समजलेले नाही. पण स्थानिक राजकीय संघर्षातून दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.