सोलापूर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.तसेच धार्मिक ठिकाणीही गर्दी करून नये अशीही सूचना देण्यात आली आहे. पण या सर्व नियमांचे उल्लंघन करत अक्कलकोट तालुक्यात परमेश्वर देवस्थानची यात्रा भरवण्यात आली. याप्रसंगी पोलिसांनी हटकले असता गावकऱ्यांनी थेट दगडफेक केली.
वागदरी या गावात यात्रेत रथ ओढण्याचा कार्यक्रम दरवर्षी होतो. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक विधी रद्द करण्यात आलेले होते. रविवारी सायंकाळी मंदिरात पूजेचा कार्यक्रम होता. फक्त पूजा करून गावकऱ्यांनी जावे अशी पोलिसांनी विनंती केली होती. तशी त्यांना नोटीस सुद्धा यापूर्वी देण्यात आल्याचे समजते.
यावेळेस मोठ्या संख्येने तरुण जमा झाले होते. सर्व धार्मिक विधी रद्द झाले असले तरी काही जमलेल्या तरुणांनी यात्रेतील रथ ओढण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी अटकाव केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, तीन पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड असे पाच जण जखमी झाले.
संचारबंदी असताना सर्व धार्मिक कार्यक्रम राज्यात स्थगित केलेले असतानासुद्धा वागदरीत हा निंदनीय प्रकार घडला आहे. याप्रकरणी अनेक दोषींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.