पुणे – कर्जाची परतफेड करण्यासाठी एकाने दुचाकी चोरून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकींची विक्री चाेरट्याने दौंड तालुक्यात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
अरविंद मोतीराम चव्हाण ( ३९, रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. चव्हाणने सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरातून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी कल्याण बोराडे आणि शरद घोरपडे सोमवार पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी संशयित चोरटा चव्हाणला पाहिले. त्यांनी चव्हाणला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण पोलिसांना पाहताच दुचाकीवरुन पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता, त्याच्या जवळील दुचाकी चोरीची असल्याचे आढळले.
चव्हाण हा दौंडचा रहाणारा असून पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. पगारात भागत नसल्याने तो घर चालवण्यासाठी गावातील अनेकांकडून दरवेळी चार पाच हजार उसणे घेत होता. पैसे देणाऱ्यांनी तगादा लावल्यावर तो चोरीची बाईक स्वत:ची असल्याचे सांगत त्यांना विकत होता. कर्जही फिटत होते तसेच वरती काही पैसेही त्याला मिळत होते. तो दौडवरुन लोकलने पुण्यात येत होता. आठड्यातून एखाद्या दुसऱ्यावेळी तो परिसरातून दुचाकी चोरुन त्यावरुन गावाकडे जात होता. त्याच्याकडून बंडगार्डन आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार, अंमलदार इम्रान शेख, रोहिदार वाघेरे, रविंद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहिम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, अविनाश दरवडे, अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली.
तपास पथकाचे उपनिरीक्षक सुनिल रणदिवे यांनी सांगितले की, चव्हाणकडे एक बनावट चावी होती. नव्या दुचाकींचे लॉक बनावट चावीने उघडत नाही. यामुळे तो २०१६-१७ पुर्वीच्या दुचाकी हेरायच्या. त्यांचे लॉक बनावट चावीने सहज उघडले जाते. यानंतर तो दुचाकी चोरुन पळ काढायचा. काही दुचाकी त्याने ढकलत चावीवाल्याकडे नेल्या होत्या. चावी हरवल्याचे सांगत त्याने बनावट चावी बनवून दुचाकी गावी नेल्या.