नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस रहिवाशी असलेल्या नागपूर शहरात रस्ताच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले २४ वर्ष रस्त्याविना आहेत. आता या सर्वानी शासनाविरोधात एल्गार पुकारत रस्ता चोरीची तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारकर्त्यांनी म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन शासकीय विभागांना सदर प्रकरणी जबाबदार धरले आहे. एकीकडे सरकार पाहिजे त्याला घर देण्यात व्यस्त आहे, मात्र आवश्यक सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. म्हाडा कॉलनीत गेली २४ वर्ष झाले रस्ता बनत नाही आहे. याबाबत म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास हे दोन्ही विभाग एकमेकांवर चालढकल करतात. त्यामुळे कंटाळून येथील रहिवाश्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली आहे.
१९९५ मध्ये म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना साडे चारशे चौरस फुटाचे घर दिले होते. तसेच १९९५ च्या नकाशावर १२ मीटर रुंदीचा मंजूर रस्ता सुद्धा होता. मात्र तो रस्ता आता चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.