पिंपरी – महापालिकेकडे बुधवारी (दि.20) सायंकाळपर्यंत तब्बल एक लाख करोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होता. परंतु लसीकरण केवळ वीसच केंद्रांवर सुरू आहे. नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने लसीकरण केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट केली आहे. तसेच केंद्रांवरील मनुष्यबळ देखील वैद्यकीय विभागाने कमी केले आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी नागरिक रांगा लावत होते. ऑनलाइन बुकींग व्हावे म्हणून प्रयत्न करत होते. परंतु करोनाची लाट ओसरतातच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे काही देशांमध्ये करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. देशातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असताना सर्वच नागरिकांना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देऊन प्रिकॉशन डोस देणेही गरजेचे होते. परंतु तसे होताना दिसत नाही.
शहराची लोकसंख्या 27 लाख असल्याचे मानले जाते. परंतु आतापर्यंत केवळ 16 लाख 54 हजार 976 नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. सुमारे दोन लाख नागरिक असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतला परंतु दुसरा घेतला नाही. अजूनही असे अनेक नागरिक आहेत ज्यांनी पहिला डोस देखील घेतला नसल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 61 हजार 598 नागरिकांनी करोनाचा प्रिकॉशन डोस घेतला आहे.
महापालिकेकडे सध्या कोविशिल्ड – 36 हजार 180, कोव्हॅक्सिन – 22 हजार 280 तर, कोर्बेव्हॅक्स – 54 हजार 20 इतक्या लस उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असताना महापालिका प्रशासनाकडून सध्या 20 केंद्रावरच लसीकरण केले जात आहे. त्यातही या तिन्ही प्रकारच्या लस सर्व केंद्रांवर उपलब्ध नसतात. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण घटल्याने त्या प्रमाणातच लस उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
18 ते 45 वयोगटात सर्वाधिक लसीकरण
शहरामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटातील 11 लाख 84 हजार 764 नागरिकांना करोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यापैकी 10 लाख 99 हजार 793 नागरिकांनी करोनाचा दुसरा डोस घेतला आहे. तर, 410 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. 45 ते 60 वयोगटातील 3 लाख 3 हजार 275 नागरिकांनी करोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 2 लाख 71 हजार 999 नागरिकांना करोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 971 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील 69 हजार 272 मुलांना करोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यापैकी 45 हजार 636 मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वयोगटात 18 हजार 821 मुलांनी करोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 562 मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
पालिकेकडे सर्व प्रकारच्या लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांचा करोना लसीकरणासाठी प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे मोजक्याच केंद्रांवर आवश्यकतेनुसार लसीकरण केले जात आहे. लसीकरणाच्या कामासाठी सुरुवातीला 500 जणांचे मनुष्यबळ होते. तर, सध्या केवळ 125 जणांचे मनुष्यबळ कार्यरत आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.