मुंबई – अमेरीकात पुन्हा आक्रमक व्याजदर वाढ होण्याची शक्यता वाढल्यानंतर पुन्हा जागतीक शेअर बाजारात विक्रीचे वारे घोंगाऊ लागले आहेत. त्याचा भारतीय बाजारावरही परिणाम होऊन निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 208 अंकांनी कोसळून 62,626 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 444 अंकांनी कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकांनी म्हणजे 0.31 टक्क्यांनी कमी होऊन 18,642 अंकावर बंद झाला.
टाटा स्टील, डॉक्टर रेड्डीज, इन्फोसिस, स्टेट बॅंक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बॅंक, इंडसइंड बॅंक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, मारुती या कंपन्यांना विक्रीचा भडीमार सहन करावा लागला. मात्र अशा परिस्थितीतही अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रीड, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली.
दक्षिण कोरिया, हॉंग कॉंगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. तर जपान आणि चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. वॉल स्ट्रीट आणि युरोपमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. या घडामोडीचा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना अगोदरच अंदाज झाल्यामुळे काल या गुंतवणूकदारानी 1,139 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात अमेरिकेत व्याजदर वाढ होणार नाही असे गृहीत धरले जात होते. त्यामुळे डॉलर घसरत होता. भारतातील परकीय गुंतवणूक वाढत होती. मात्र आता पुन्हा अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार परत जात आहेत.
त्यातच चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा भारतावर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री चालू आहे. त्यातच रिझर्व्ह बॅंकेचे पत धोरण बुधवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे व्याजदराशी संबंधित कंपन्यांच्या शेअरची आज विक्री झाली. धातू, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, ग्राहक वस्तू, रिऍल्टी क्षेत्राला आजच्या विक्रीचा फटका बसला.