मुंबई, दि. 22- निर्देशांक बऱ्याच कमी पातळीवर असूनही जागतिक स्तरावर करोनाचे रुग्न वाढत असल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजार निर्देशांकांत माफक घट झाल्याचे दिसून आले. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.17 टक्क्यांनी म्हणजेच 86 अंकांनी कमी होऊन 49,771 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ सात अंकांनी कमी होऊन 14,731 अंकांवर बंद झाला एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, पावर ग्रिड, बजाज फायनान्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर टेक महिंद्रा, सन फार्मा, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
अमेरिकेच्या कर्ज राख्यावरील परतावा आणखी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे जागतिक स्तरावर शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. गेल्या आठवड्यात मोठ्या कंपन्याबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली होती. सोमवारी मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले असले तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप वाढल्याचे दिसून आले.