मुंबई – आशियायी शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात अखेरच्या सत्रात निवडक खरेदी झाली. त्यामुळे सध्याच्या नकारात्मक वातावरणामध्ये निर्देशांक वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 187 अंकांनी म्हणजे 0.33 टक्क्यांनी वाढून 57,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांनी वाढून 17,266 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. पावर ग्रिड, टिसीएस, टेक महिंद्रा, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 11 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मंगळवारी शेअरबाजार निर्देशांकात थोडीफार वाढ झाली असली तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी 1,157 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जपान, चीन आणि दक्षिण कोरियातील शेअरचे भाव वाढले होते. त्याचबरोबर युरोपीयन शेअर बाजारातूनही सकारात्मक संदेश आले. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी पुढाकार घेऊन खरेदी केली.