मुंबई – अमेरिकेत प्रदीर्घकाळ व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेसह युरोप आणि आशिया खंडातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजारात विक्री झाली आणि शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले.
आजच्या विक्रीचा फटका ऊर्जा, बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांना बसला. सकाळी बाजार उच्च पातळीवर उघडला होता. मात्र नंतर विक्रीचा जोर वाढला. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 311 अंकांनी कमी होऊन 60,691 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 99 अंकांनी म्हणजे 0.56 टक्क्यांनी कमी होऊन 17,844 अंकावर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, मारुती, कोटक बॅंक या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. शुक्रवारी सेन्सेक्स 317 अंकांनी कोसळला होता. आज विक्रीच्या वातावरणातही अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजी, महिंद्रा, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
या अगोदरच्या पतधोरणात फेडरल रिझव्हने व्याजदरात पाव टक्के वाढ केली आहे. आता अमेरिकेच्या रझर्व्हच्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर होणार आहे. यामध्ये प्रदीर्घकाळ व्याजदरात वाढ करावी लागण्याची शक्यता व्यक्त होण्याची शक्यता आहे. कारण महागाई कमी करणे गरजेचे आहे. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, जोपर्यंत महागाई कमी होणार नाही तोपर्यंत युरोप आणि अमेरिकेतील रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करत राहण्याची शक्यता आहे.
मुख्य निर्देशांकांबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 0.6% तर मिड कॅप 0.12 टक्क्यांनी कमी झाला. तेल आणि नैसर्गिक वायू, बॅंकिंग, ऊर्जा, वित्तीय सेवा, रिऍल्टी, दूरसंचार या क्षेत्राचे निर्देशांक घसरले तर माहिती तंत्रज्ञान, वाहन आणि सेवा क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 624 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. गेल्या आठवड्यात काही दिवस या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी केली होती. मात्र आता हे गुंतवणूकदार विक्री करत आहेत. त्यामुळे निर्देशांकांवरील दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.