मुंबई – सकाळी युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही जोरदार विक्री होऊन निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 554 अंकांनी कमी होऊन 60,754 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 195 अंकांनी म्हणजे 1.07 टक्क्यांनी कमी होऊन 18,113 अंकांवर बंद झाला.
मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडसइंड बॅंक या कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. मात्र अशा परिस्थितीतही ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक, डॉ. रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडेफार वाढ होऊ शकली.
जपान, दक्षिण कोरिया या देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. युरोपातही जोरदार विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री झाल्याचे दिसून आले. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे क्रुडच्या किमती वाढत असून आता क्रुडच्या किमती 87 डॉलर प्रति पिंपापर्यंत गेल्या आहेत.
अमेरिकेत होत असलेल्या व्याजदर वाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून परत जाण्याची भीती निर्माण झाली होती. ती आता खरी ठरत असल्याचे वातावरण आहे. काल या गुंतवणूकदारांनी 855 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.
चालू खात्यावरील तूट वाढत असल्यामुळे व क्रुडचे दर वाढत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येऊ लागला आहे. आज रुपयाचे मूल्य 33 पैशांनी कोसळून 74.58 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार अस्वस्थ झाले होते. आगामी काही महिने रुपयाचा दर घसरत जाण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली आहे