Stock Market | शेअर बाजारांना करोनाचा संसर्ग; निर्देशांकात मोठी ‘घट’

मुंबई – भारतामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायांची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजार निर्देशांक कोसळले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1.81 टक्‍क्‍यांनी म्हणजे 882 अंकांनी कोसळून 47,949 आमचा वर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 1,469 अंकापर्यंत कोसळला होता. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सोमवारी 258 अंकांनी कोसळून 14,359 अंकांवर बंद झाला.

पावर ग्रिडचा शेअर 4 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्याचबरोबर ओएनजीसी, इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, एल अँड टी, एशियन पेंट्‌स या कंपन्यांना तुफान विक्रीचा मारा सहन करावा लागला. याला फक्त डॉ. रेड्डीज आणि इन्फोसिस या दोन कंपन्या अपवाद ठरल्या.

रिलायन्स सिक्‍युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद मोदी यांनी सांगितले की, करानाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आणि जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारांमध्ये विक्रीचे वातावरण आहे. भारतातील बऱ्याच शहरात आता निर्बंध लागू केले आहेत. त्याचा कारखान्यांच्या कामकाजावर व व्यापारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत.

रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी या निर्यात करणाऱ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले. वित्तीय कंपन्या आणि वाहन कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठी घट झाली.

अनेक अनिश्चितताचा सामना भारतीय अर्थव्यवस्था करीत असल्यामुळे अस्थिरता निर्देशांक जवळजवळ 11 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे आज सांगण्यात आले. भारतातील दिड कोटी लोक विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. तर दिवसाला करोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या 2 लाख 73 हजारावर गेली आहे.

औद्योगिक दृष्टया महत्त्वाच्या दिल्ली राज्यांमध्ये एक आठवड्याचे लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने लॉक डऊन सुरू करण्याच्या सुचना सरकारला दिल्या आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील परिस्थिती बिघडत चालली आहे. जागतिक बाजारातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.