मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी शेअर बाजार निर्देशांकांत माफक वाढ नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 69 अंकांनी वाढून 58,247 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी वाढून 17,380 या विक्रमी पातळीवर बंद झाला.
माहिती तंत्रज्ञान, बॅंका, इंजिनिअरिंग या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. इंडसइंड बॅंक, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, टाटा स्टील बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
जागतिक बाजारातून आज संमिश्र संकेत आल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे निर्णय घेता आले नाहीत. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरू केली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुंतवणूकदारांनी काल 1,419 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केल्याची माहिती शेअर बाजारांनी जारी केली आहे.