मुंबई – शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून नफा काढून घेणे चालूच आहे. त्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 379 म्हणजे 0.73 टक्क्यांनी कमी होऊन 51,324 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 89 अंकांनी कमी होऊन 15,118 अंकावर बंद झाला.
असे असले तरी ओएनजीसी कंपनीचा शेअर 8 टक्क्यांनी वाढला. एशियन पेंटस्, टेक महिंद्रा, पावर ग्रिडच्या शेअरच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. बजाज फायनान्स, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
महगाई डोके वर काढण्याची शक्यता वाढल्यामुळे आणि क्रुडचे दर वाढत असल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे दिसून येते.
या विक्रीच्या काळात खासगी बॅंका, सरकारी बॅंका आणि वाहन कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. वाहन, आरोग्य आणि दूरसंचार क्षेत्राचे निर्देशांक आज दिड टक्क्यापर्यंत कमी झाले.
मोठ्या कंपन्याचे शेअर घसरुन मुख्य निर्देशांक कमी होत असले तरी गुंतवणूकदार छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत असल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅपआणि स्मॉल कॅप 0.69 टक्क्यांपर्यंत वाढले. गेल्या तीन दिवसापासून मिड कॅप व स्मॉल कॅप वाढत आहेत. मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या कंपन्यांचे आकर्षण कमी झाले आहे.
निर्देशांक कमी होत असतानाच परदेशी संस्थागत गुंतवणूकदार मात्र भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण असून बुधवारी या गुंतवणूकदारांनी 1,008 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.