मुंबई – एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सहा कामकाजाच्या दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ 11 टक्क्यांनी वाढले होते. मंगळवारी सकाळीही बरीच खरेदी झाली होती. मात्र नंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे सहा दिवसानंतर निर्देशांकात किरकोळ घट झाली. आता आगामी काळात निर्देशांक कोणती दिशा घेतील याबाबत गुंतवणूकदार चिंतन करण्याची शक्यता आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 20 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी कमी होऊन 51,329 या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ सहा अंकानी कमी होऊन 15,109 अंकावर बंद झाला.
निफ्टीने 15, 100 ची पातळी कायम राखल्याबद्दल गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले.
नफेखोरीसाठी गुंतवणूकदारांनी वाहन, औषधी, धातू आणि सरकारी बॅंक क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली. या आठवड्यात या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली होती. आज 1,658 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर 1303 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांनाही विक्रीचे ग्रहान लागल्यामुळे मिडकॅप 0.18 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.26 टक्क्यांनी कमी झाले.
बजाज अमाईन्स कंपनीच्या ताळेबंदातील नफा दुपटीपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती आज कंपनीने जाहीर केल्यानंतर या कंपनीचा शेअर एक वेळ 20 टक्क्यांपर्यंत वाढला होता. दिवसाअखेरीस या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला होता. मुख्य निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर महाग झाल्यामुळे आता गुंतवणूकदार छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.
बाळकृष्ण टायर्स या कंपनीने अंतर्गत महसूलातून काही भांडवली खर्च करण्याची घोषणा केल्यानंतर या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी कमी झाला. बर्जर पेंटस् या कंपनीचा नफा 51 टक्क्यांनी वाढल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात दोन टक्के वाढ झाली.
अदानी पोर्ट या कंपनीचा नफा फारसा वाढला नसल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचा भाव स्थिर राहिला. जागतिक बाजारातील शेअरचे भाव आजचा सातव्या दिवशीही वाढले तर टेस्ला कंपनीने बिटकॉइन मध्ये जवळजवळ दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे ठरविल्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे दर 20 टक्क्यांनी उसळले.