मुंबई – अगोदरच परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत असतानाच अमेरिकेतील महागाई आणखी वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या महिन्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करणे निश्चित झाले आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतावर होऊन सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 2,839 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे कच्च्या तेलाचे दर आता 100 डॉलरच्या खाली स्थिरावले आहेत. जर कच्च्या तेलाचे दर याच पातळीवर कायम राहिले तर भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 98 अंकांनी कमी होऊन 53,416 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी म्हणजे 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 15,938 अंकावर बंद झाला.
कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्यामुळे भारतातील तेल कंपन्यावर लावण्यात आलेला विंड फॉल टॅक्स कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे आज तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली असल्याचे बोलले जाते. अमेरिकेतील महागाई वाढत असली तरी भारतातील महागाई कमी होत असल्याची आकडेवारी या आठवड्यात जाहीर झाली आहे. किरकोळ किमतीवरील आधारित महागाइ व घाउक किमतीवरील महागाई उच्च पातळीवरील असली तरी ती वाढत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नजीकच्या काळामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज ऍक्सिस बॅंक, एचसीएल टेक्नॉलॉजी, स्टेट बॅंक, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बॅंक, रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान, धातू, दूरसंचार, बॅंकिंग या क्षेत्राचे निर्देशांक घसरले तर तेल आणि नैसर्गिक वायू आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले.