मुंबई – युक्रेनमधील प्रसंगामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदार खरेदी करण्यासाठी धजावत नाहीत. कालच्या प्रमाणे आजही दिवसभर खरेदी-विक्रीच्या लाटा नंतर निर्देशांकात घट झाली. गेल्या तीन दिवसापासून निर्देशांकात घट होत आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 59 अंकांनी कमी होऊन 57,832 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी कमी होऊन 17,276 अंकांवर बंद झाला.
अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र एचडीएफसी, एल अँड टी,ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली. सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधक विनोद नायर यांनी सांगितले की, सकाळी अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये घट नोंदली गेली होती. मात्र नंतर अमेरिका आणि रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री युक्रेन संदर्भात भेटण्याची शक्यता वाढल्यानंतर अमेरिकेच्या शेअर बाजार निर्देशांकांत वाढ नोंदली गेली. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारातील व्यवहारावर पडले. जोपर्यंत युक्रेनचा प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत जागतिक शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहणार आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 319 अंकांनी कमी झाला. तर निफ्टी 98 अंकांनी कमी झाला. अमेरिकेची रिझर्व बॅंक मार्च महिन्यामध्ये व्याजदरात पाव टक्के वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे अगोदरच शेअर बाजारात विक्री होत असताना युक्रेनचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यात अधिकच भर पडली आहे असे त्यांनी सांगितले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 1,242 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. नैसर्गिक वायू, रिऍल्टी,धातू, आरोग्य या क्षेत्राच्या निर्देशांकात सव्वा टक्केपर्यंत घट झाली.