मुंबई – कमी व्याजदराबरोबरच भांडवल सुलभता अबाधित राखण्याचे संकेत अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने दिल्यानंतर जागतीक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले. आज निर्देशांक दीड टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे गुंतवणूकदाराकडील गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 3.56 लाख कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य 247.30 लाख कोटी रुपये इतके झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 765 अंकांनी वाढून 56,889 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी वाढून 16,931 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स गेल्या तीन दिवसापासून तर निफ्टी गेल्या सहा दिवसांपासून एकतर्फी वाढत आहेत.
एअरटेल, ऍक्सिस बॅंक, टाटा स्टील, टायटन, बजाज फायनान्स, मारुती, स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात सव्वा चार टक्क्यापर्यंत वाढ झाली. सेन्सेक्ससंदर्भातील 30 पैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्यामध्ये टेक महिंद्रा, नेस्ले, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांचा समावेश आहे.
रुपयाचे मुल्य गेल्या चार दिवसापासून वाढत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री होत असल्याचे दिसून आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये सोमवारी घसघशीत वाढ झाली. वित्तीय क्षेत्र व धातु क्षेत्राचे निर्देशांक जास्त प्रमाणात वाढले. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरपूर वाढ झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप व स्मॉल कॅप 1.72 टक्क्यापर्यंत वाढल्याचे दिसून आले.
जगातील रिझर्व्ह बॅंकांच्या गव्हर्नरच्या परिषदेमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, वर्षाअखेरपर्यंत तरी व्याजदरात वाढ करण्यात येणार नाही. त्याचबरोबर भांडवल सुलभता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या कारणामुळे अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही त्यामध्ये आज दीड टक्क्यापर्यंत वाढ झाली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. दरम्यानच्या काळामध्ये रुपयाच्या मूल्यामध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला.