मुंबई – चीनमध्ये वाढत असलेल्या करोनासह जागतिक पातळीवरून अनेक नकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तुफान विक्री होऊन आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 980 अंकांनी कोसळून 59,845 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 1,060 अंकापर्यंत कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 320 अंकांनी म्हणजे 1.77 टक्क्यांनी कोसळून 17,806 अंकावर बंद झाला.
टाटा स्टीलचा शेअर आज पाच टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, स्टेट बॅंक, बजाज फिन्सर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बॅंक, लार्सन अँड ट्युब्रो या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. जपान, चीन, हॉंगकॉंग, अमेरिका, युरोप येथील शेअर बाजाराचे निर्देशांक आज कोसळले होते.
रॅली गेअर ब्रोकिंग या संस्थेचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनमधून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी झाली नाही. परदेशी गुंतवणूदारांनी मात्र गुरुवारी 928 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.