मुंबई – गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कमी होत होते. काल निर्देशांकात 2 टक्क्यांची मोठी घट नोंदली गेली. मात्र आज दूरसंचार धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकाचा थोडाफार आधार मिळाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 700 अंकांनी घसरला होता. मात्र नंतर त्यात सुधारणा झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 198 अंकांनी वाढून 58,664 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी वाढून 17,503 अंकांवर बंद झाला.
पावर ग्रिड, एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, सन फार्मा, बजाज फिन्सर्व या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. मात्र इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, बजाज ऑटो, मारुती या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मुख्य निर्देशांकापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आज 1.81 टक्क्यांची वाढ झाली. जागतिक बाजाराचे निर्देशांक कमी असूनही आज गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत वाढ होऊ शकली असे विश्लेषकांनी सांगितले.
तेजी – मंदीचा अंदाज
क्रूडच्या किमती कमी करण्यासाठी अमेरिका, भारत आणि जपानने आपल्या राखीव साठ्यातील बराच साठा खुला केला आहे. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या किमती कमी होणार आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावर नोंदलेल्या तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या शेअरवर होण्याची शक्यता आहे. एअरटेल, व्होडाफोन कंपनीने मोबाईल दरात वाढ केल्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या तेजीत राहतील. कालच्या मोठ्या घसरणीनंतर निफ्टी आज काही प्रमाणात सावरला असला तरी आगामी काही काळ तरी गुंतवणूकदारांनी सावध राहावे असे कोटक सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले. डे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी 17,400 ही पातळी महत्त्वाची आहे. जर खरेदी कायम राहिली तर निफ्टी 17,600 ते 17,650 अंकांपर्यंत वाढू शकतो आणि जर विक्रीचे वारे आले तर 17,200 वर निफ्टीेला बळकट आधार आहे.