मुंबई – भारतीय शेअर बाजार निर्देशांक फुगले असल्यामुळे देशांतर्गत आणि परदेशी संस्था गुंतवणूकदारांकडून विक्री करून नफा काढून घेणे चालूच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार निर्देशांकांत घट होत आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2818 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 101 अंकांनी कमी होऊन 60,821 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63 अंकांनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 18,114 अंकांवर बंद झाला.
आयटीसी, मारुती सुझुकी, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर एचडीएफसी, बजाज ऑटो, इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, टायटन, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
शेअर बाजारानी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 2,818 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच देशांतर्गत गुंतवणूकदारही विक्री करीत असल्याचे शेअर बाजारात वातावरण आहे. त्यामुळे निर्देशांक स्थिर होईपर्यंत किरकोळ गुंतवणूकदार तटस्थ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या चार दिवसात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे कंपन्याचे बाजार मुल्य 10.29 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.