नवी दिल्ली – ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतीक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर राहिले. त्याचा परिणाम भारतातही झाला आणि शेअर बाजार निर्देशांकांत घसरण चालू राहिली. त्यातच किरकोळ आणि घाऊक महागाईच्या दरात वाढ होत असल्याबद्दल भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 166 अंकांनी कमी होऊन 58,117 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.25 टक्क्यांनी म्हणजे 43 अंकांनी कमी होऊन 17,324 अंकांवर बंद झाला.
आयटीसी, बजाज फायनान्स, कोटक बॅंक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. पावर ग्रीड, ऍक्सिस बॅंक, नेस्ले, डॉ. रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. वाहन, बॅंकींग व वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची विक्री झाली. तर औषधी व धातू क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची खरेदी झाल्याचे दिसून आले.
कॅपीटालव्हीया ग्लोबल रिसर्च या संस्थेच्या संशोधक लिखिता चेपा यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या प्रसाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. चीन, दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग इत्यादी शेअर बाजारातून विक्री होत असल्याचे वृत्त आहे.
तेजीच- मंदीचा अंदाज
शेअर बाजारातील घडामोडीबाबात विश्लेषकांनी सांगितले की, आता करेक्शनचा एक टप्पा पार पडला आहे. आता फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणानंतर जागतीक परिस्थिती स्पष्ट होणार आहे. आता निफ्टीने 17,350 ची पातळी ओलांडणे आवश्यक आहे. तसे झाले तर निफ्टी 17,500 च्या पुढे जाऊ शकतो. मात्र विक्रीचा जोर वाढला तर निफ्टीला 17,200 वर चांगला आधार आहे. जर फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याचे संकेत दिले तर भारतातील परकीय संस्थागत गुंतवणूक कमी होऊन निर्देशांकाची हाणी होऊ शकते. त्याचबरोबर ओकायक्रॉनवरही निर्देशांकाची वाटचाल अवलंबून राहणार आहे.