मुंबई – गुरुवारी माहिती-तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढून नव्या उच्चांकी पातळीवर गेले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 254 अंकांनी वाढून 53,158 या नव्या उच्चांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 70 अंकांनी वाढून 15,952 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, एल अँड टी या कंपन्यांबरोबरच टेक महिंद्रा, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर भारती एअरटेल, महिंद्रा, एशियन पेंट्स, टायटन, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली.
करोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याचबरोबर जागतिक बाजारातही अनिश्चित परिस्थिती असूनही गुंतवणूकदारांनी बॅंका आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. भांडवली वस्तू क्षेत्र आता तेजीत येऊ लागले आहे.
रिऍल्टी आणि धातू कंपन्यांच्या शेअरचीही गुरुवारी खरेदी झाली. तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, ऊर्जा आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप व स्माल कॅप 0.4 टक्क्यांपर्यंत वाढले.