मुंबई – अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने कडक पतधोरणाचे संकेत देऊनही आणि शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुरुवारी शेअर बाजारात तुफान खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले. रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळेही शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 958 अंकांनी वाढून 59,885 या नव्या उच्चांकी पातळीवर गेला. आता हा निर्देशांक 60 हजार अंकासमीप आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 276 अंकांनी म्हणजे 1.57 टक्क्यांनी वाढून 17,822 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने जाहीर केलेल्या पतधोरणांमध्ये नोव्हेंबर पासून भांडवल सुलभता कमी करण्याचे आणि व्याजदर वाढविण्याची संकेत देण्यात आले आहेत. मात्र याकडे जगभरातील गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करून खरेदी केल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. भारतातील विविध शहरांत घरांची विक्री वाढत असल्यामुळे चीनमधील पेच प्रसंगाकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली.
भारतामध्ये करोना रुग्णांची संख्या कमी पातळीवर आहे. त्याचबरोबर मुबलक लस असल्यामुळे भारत आता लसीची निर्यात करणार आहे. त्यामुळे करोना आघाडीवर परिस्थिती सुधारत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला वेग येईल असेल गुंतवणूकदारांना वाटत आहे. सध्याच्या खरेदीमध्ये विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारही सामील झाले असल्याचे वातावरण आहे.
मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावाबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप सव्वा टक्क्यांपर्यंत वाढले. रिऍल्टी क्षेत्राबरोबरच बॅंकिंग, ऊर्जा, वित्त, भांडवली वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक 8.71 टक्क्यापर्यंत वाढले. रिलायन्स, एचडीएफसी बॅंक, बजाज फिन्सर्व, ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. फक्त डॉ. रेड्डीज, आयटीसी, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार घट झाली.