मुंबई- टाटा मोटर्स आपला चौथ्या तिमाहीचा ताळेबंद लवकरात जाहीर करणार असतानाच गेल्या तीन दिवसापासून या कंपनीचा शेअर वाढत आहे. 29 मार्चपासूनच या कंपनीच्या शेअरचा भाव एकतर्फी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रेखा झूनझूनवाला यांनी या कंपनीत बरीच गुंतवणूक केलेली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 512 रुपये या पातळीवर आहे. काही महिन्यापासून या कंपनीच्या वाहनांची विक्री वाढत आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार कंपनीच्या शेअरची खरेदी करीत असल्याचे दिसून येते.
टाटा मोटर्स चौथ्या तिमाहीचा आणि सरलेल्या वर्षाचा ताळेबंद 12 मे रोजी जाहीर करणार आहे. याबाबत बरेच गुंतवणूकदार आशावादी आहेत. नव्या उत्सर्जन मानदंडाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीने बरीच गुंतवणूक केल्यामुळे कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. तरीही त्या कंपनीच्या व्यवसायिक वाहनाच्या आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जग्वार लॅंड रोव्हर या कंपनीची विक्रीही वाढत आहे.
दोन वर्षाच्या तोट्यानंतर डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहित कंपनीला नफा मिळविण्यात यश आले होते. आता मार्च अखेरच्या तिमाहित कंपनीचा नफा वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. 2016 पासून कंपनीने लाभांश जाहीर केलेला नाही. यावेळी कंपनी लाभांश जाहीर करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.