मुंबई – गेल्या आठवड्यात शेअर निर्देशांक घसरल्यामुळे बऱ्याच कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल खरेदी केल्याची आकडेवारी समोर आल्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 578 अंकांनी वाढून 59, 719 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 194 अंकांनी म्हणजे 1.10 टक्क्यांनी वाढून 17,816 अंकावर बंद झाला.
सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, इंडसइंड बॅंक, टाटा स्टील, टायटन, बजाज फिन्सर्व, आयसीआयसीआय बॅंक, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर नेस्ले, पावर ग्रीड, इन्फोसिस, रिलायन्स, इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
दक्षिण कोरिया, जपान, शांघाय, हॉंगकॉंग या आशिया खंडातील देशात वातावरण सकारात्मक होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 312 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे आज शेअर बाजारामध्ये किरकोळ गुंतवणूकदाराकडून खरेदी झाली असल्याचे दिसून येते.