मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 452 अंकांनी कमी होऊन 59,900 अंकावर बंद झाला. बऱ्याच दिवसानंतर सेन्सेक्स 60,000 अंकाच्या खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 132 अंकांनी म्हणजे 0.74 टक्क्यांनी कमी होऊन 17,859 अंकावर बंद झाला.
टीसीएस कंपनीला विक्रीचा सर्वाधिक फटका बसून या कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी कोसळला. इंडसइंड बॅंक, बजाज फिन्सर्व, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांनाही विक्रीचा मारा सहन करावा लागला. सेन्सेक्स संदर्भातील फक्त महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, आयटीसी, लार्सन ऍण्ड ट्युब्रो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात एक टक्क्यापर्यंत वाढ झाली.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीत जोखीम घेण्यास अजिबात तयार नाहीत. फेडरल रिझर्व्हचे इतिवृत्त जाहीर झाले आहे. या इतिवृत्तात महागाई जोपर्यंत दोन टक्क्यापर्यंत कमी होत नाही तोपर्यंत व्याजदरात वाढ करण्याची आवश्यकता सदस्यांनी व्यक्त केली. सध्या अमेरिकेतील महागाई 8% च्या जवळपास आहे. ती कमी होत असली तरी महागाई कमी होण्याचा वेग कमी आहे असे बऱ्याच सदस्यांनी बोलून दाखविले.
अमेरिकेतील मंदी आणि व्याजदरवाढ या कारणामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावावर जोरदार परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आठवड्याच्या पातळीवरही सेन्सेक्स 940 अंकांनी तर निफ्टी 245 अंकांनी म्हणजे 1.36 टक्क्यांनी कमी झाला. राष्ट्रीय नाणेनिधीच्या अधिकाऱ्यांनी यावर्षी जागतिक पातळीवर मंदीचा इशारा व्यक्त केला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक भारतातून परत जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय निर्देशांकावरील दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सध्या गुंतवणूकदार शेअर बाजारात किंवा रोखे बाजारात गुंतवणूक कमी करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बॅंकातील ठेवीकडे गुंतवणूकदार लघु पल्ल्यात आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅप 0.73 टक्क्यांनी व मिडकॅप 0.72 टक्क्यांनी कमी झाला. ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक कमी झाल्याचे दिसून आले. भारताप्रमाणे जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1,449 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.